
इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्जसच्या संघावर 6 धावांनी निसटता विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं.
ऐतिहासिक सामन्यामध्ये पंजाबच्या संघाला 190 धावांचा पाठलाग करताना 184 पर्यंतच मजल मारता आल्याने पहिलं आयपीएल जेतेपद पटकावण्याचं त्यांचं स्वप्न भंग पावलं. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अहमदाबादमध्ये ज्या मैदानात अंतिम सामना झाला त्याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या पंजाबच्या संघाने अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात कच खाल्ली. या सामन्यानंतर बक्षीस वितरण सामरंभामध्ये श्रेयस अय्यरने उपविजेता संघ म्हणून संघाच्यावतीने 12 कोटी 50 लाखांचा धनादेश स्वीकारला. पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये श्रेयसने पंजाब हा सामना कोणामुळे गमावला हे सांगितलं.
संघ फार उत्तम खेळला
जे झालं त्याबद्दल वाईट वाटत असल्याचं श्रेयस म्हणाला. तसेच आम्ही ज्याप्रकारे धावांचा पाठलाग केला ती पद्धत फारशी योग्य नव्हती असंही श्रेयसने संघाच्या कामगिरीवर कटाक्ष टाकताना म्हटलं. मात्र संपूर्ण मालिकेचा विचार केल्यास आमचा संघ फारच उत्तम खेळल्याचं श्रेयसने म्हटलं. ज्या पद्धतीने सर्व स्टाफने आणि मालकांनी आमच्या संघातील खेळाडूंना पाठिंबा दर्शवला ते फारच छान होतं, असंही श्रेयसने म्हटलं.
या खेळाडूमुळे झाला पराभव
श्रेयसने पंजाबचा संघ सामना कोणामुळे पराभूत झाला याबद्दल बोलताना आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा उल्लेख केला. “200 धावांपर्यंतचं लक्ष गाठता आलं असतं. मात्र क्रृणाल पांड्याने फारच उत्तम गोलंदाजी केली,” असं म्हणत श्रेयसने क्रृणालच्या कामगिरीचाच फटका पंजाबला बसल्याचं अधोरेखित केलं. क्रृणालच्या कामगिरीमुळे पंजाबच्या पदरात हा पराभव पडल्याची भावना श्रेयसने बोलून दाखवली. क्रृणालने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 17 धावा देत 2 गडी बाद केले. क्रृणाललाच सामनावीर हा पुरस्कार मिळाला.
पुढच्या वर्षी ट्रॉफी जिंकणार
श्रेयसने पंजाबच्या संघातील प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतोय, असं श्रेयसने आवर्जून सांगितलं. अनेकजण पहिल्यांदाच आयपीएल खेळत असल्याचंही त्याने पंजाबच्या संघातील खेळाडूंच्या योगदानाबद्दल भाष्य करताना म्हटलं. या खेळाडूंनी मेहनत घेतली नसती, सपोर्टींग स्टाफने मेहनत घेतली नसती तर आमचा संघ इतक्या दूरपर्यंत पोहचू शकला नसता. मात्र सध्या तरी अर्ध काम झालं आहे. पुढील वर्षी आम्ही नक्की ही ट्राफी जिंकू, अशा आत्मविश्वास श्रेयसने व्यक्त केला आहे. सध्याच्या संघातील अनेक खेळाडू पुढील वर्षी अनुभवी खेळाडू म्हणून खेळतील आणि ते यंदा केली त्याहून अधिक सरस कामगिरी करतील, असंही श्रेयसने म्हटलं आहे.