
म्हणाले; ‘लोकांच्या मनात…
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. एप्रिल महिन्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे परदेशात गेले होते.
उद्धव यांनी मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले होते. तर, राज यांनी युतीबाबत मनसेतील पदाधिकाऱ्यांनी काही बोलू नये असे आदेश दिले होते.
उद्धव ठाकरेंसोबत असलेले नेते मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक असताना मनसेकडून अजून युती होणार की नाही यावर स्पष्टपणे बोलणे टाळले आहे. आता थेट आदित्य ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्याला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू. म्ही पाहिले असेल की आमचे दीपेश म्हात्रे आणि मनसेचे राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केले. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहीत आहे.
आमचं मन साफ आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणाही पक्ष असो नेता असो आमच्यासोबत यायला तयार असेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी सोबत येऊन लढू.’, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत मनसेसोबत युतीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
युती ठरले संजीवनी
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट झाली. तर, मनसेला देखील यश आले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या दृष्टिने मुंबई महापालिका निवडणूक ही अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे दोघांमध्ये युतीच्या चर्चा आहेत. जर ही युती झाली तर मराठी मतदारांची एकजुट दिसून येईल. ही युती भाजपसाठी डोकेदुखी ठरेल.
शिंदेंची शिवसेना छोटा भाऊ…
मनसे आणि ठाकरेंच्या शिवेसेची युतीची चर्चा सुरू असताना मुंबई महापालिकेत महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेत शिंदेंची शिवेसना छोटा भाऊ असेल तर भाजप मोठा भाऊ असेल. ठाणे महापालिकेत शिंदेंची शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भावाच्या भूमिकेत असेल अशी चर्चा आहे.