दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड:तालुक्यातील कार्यक्षम व कर्तव्यनिष्ठ ग्रामपंचायत अधिकारी हरिश्चंद्र कुंडगीर यांना आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार” २२ जून २०२५ रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात प्रदान करण्यात आला.या राष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कारानंतर गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील ग्रामपंचायतच्या शहीद भगतसिंग सभागृहात शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी, कुंडगीर यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी राणीसावरगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंडगीर यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व फुलांचा हार घालून गौरवण्यात आले. कार्यक्रमात बोलताना अनेक मान्यवरांनी कुंडगीर यांच्या कार्यपद्धतीचे आणि समाजहिताच्या कामांचे कौतुक केले.
ग्रामपंचायतीच्या पातळीवर त्यांनी राबवलेले उपक्रम, प्रशासनातील पारदर्शकता, महिला व बालकल्याणासाठी केलेली कामगिरी, आणि समाजात सामाजिक समरसतेसाठी दिलेले योगदान यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
कुंडगीर यांच्या या यशाने संपूर्ण गंगाखेड तालुक्याचा सन्मान वाढला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
