
उत्तर कोरियाच्या नागरिकांना देशाबाहेर पडण्याची परवानगी नाही. या देशातील नागरिकांवर वेगवेगळे निर्बंध आहेत. अशातच आता एका व्यक्तीने उत्तर कोरियाच्या सुरक्षेचे उल्लंघन करून दक्षिण कोरियाच्या सीमेत प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे.
उत्तर कोरियाची सीमा ओलांडणे हे अतिशय अवघड काम आहे. मात्र तरीही या व्यक्तीने मोठ्या संयमाने सीमा ओलांडली. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
न्यूज डॉट एजने जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या एका अधिकाऱ्याचा हवाल्याने सांगितले की, ‘सीमा ओलांडल्यानंतर दक्षिण कोरियाच्या सैनिकांनी गुरुवारी रात्री उशिरा त्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी नेले. तो उत्तर कोरियाचा नागरिक होता जो त्याच्या देशातून पळून आला होता. महत्वाची बाब म्हणजे तो 20 तास न हलता एकाच ठिकाणी पडून राहिला होता, यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. देशातील माहिती बाहेर जाईल यामुळे उत्तर कोरिया कधीही आपल्या नागरिकांना सीमा ओलांडू देत नाही.
आरोपीची चौकशी सुरू
सध्या दक्षिण कोरियाचे अधिकारी या व्यक्तीची चौकशी करत आहेत. त्याने उत्तर कोरियाचा नागरिक असल्याचे सांगितले आहे. आता तो दक्षिण कोरियाच्या सैनिकांच्या ताब्यात आहे. दक्षिण सैनिकांनी सांगितले की, ‘तो नि:शस्त्र होता, परंतु तो 20 तास एकाच जागी पडून होता. तो हालचाल करू लागला तेव्हा त्याला पकडण्यात आले आता त्याला तपास अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.’
संयुक्त राष्ट्रांना दिली माहिती
या व्यक्तीबाबत संयुक्त राष्ट्रांना माहिती देण्यात आली आहे. या कृत्यामागे कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, या व्यक्तीला जाणूनबुजून बाहेर पाठवण्यात आले तर नाही ना असा तपासही सुरु आहे. कारण उत्तर कोरियाच्या सीमेवर 24 तास पहारा असतो, त्यामुळे सीमा ओलांडणे सोपे काम नाही.
डीएमझेड म्हणजे काय?
उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांनी डीएमझेड झोन तयार केले आहे. हा भाग 4 किलोमीटर रुंद बफर झोन आहे. या भागावर दोन्ही बाजूंनी कडक पहारा ठेवण्यात आला आहे. उत्तर कोरियाचे लोक चीनच्या उत्तर सीमेवरून दक्षिण कोरियाला जातात, मात्र खूप कमी लोक या भागातून सीमा पार करतात. ऑगस्ट 2024 मध्ये उत्तर कोरियाच्या एका सैनिकाने दक्षिण कोरियात प्रवेश केला होता.