
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटकरवाडी येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या वेशात भव्य फेरी काढत संपूर्ण गावाला भक्तिमय केले. या निमित्ताने गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाच्या जयघोषात पालखी सोहळा पार पडला.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पांढऱ्या धोतरावर जरीचा सादा उपरणा, डोक्यावर फेटा, हातात टाळ, भगवा ध्वज घेऊन वारकऱ्यांचा पोशाख परिधान केला होता. काही विद्यार्थी माऊली, तुकाराम महाराज, संत जनाबाई यांच्या वेशात सजले होते. ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या गजरात त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने गावातून फेरी काढली. गावातील नागरिकांनी रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी करून आणि प्रसाद वाटप करून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा प्रांगणातून मिरवणुकीला सुरुवात झाली. पालखी पूजन करून, संगीतमय वातावरणात वारी गावातील मुख्य रस्त्यांवरून फिरवण्यात आली. या फेरीस ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनात या उपक्रमाचे नियोजन केले. यामध्ये सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक,महिला व ग्रामस्थांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमामागील उद्देश
वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्तीभाव, शिस्त, साधेपणा आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ व प्रसाद वाटप करण्यात आला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाल्याने उपस्थित सर्वांचे मन भरून आले. यावेळी मुख्याध्यापक भागवत फुंदे, शिक्षक प्रविण अंधारे, अंगणवाडी सेविका राणी शिंदे, मतदनीस आसराबाई तट्टू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.