मोठे नेते तातडीने एकनाथ शिंदेंच्या भेटीला…
हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात उसळलेल्या संतापानंतर शिवसेना (ठाकरे गट) व मनसेने संयुक्त मेळाव्याचं आयोजन करत एकत्रित शक्ती दाखवली. वरळी डोममध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “एक गद्दार जय गुजरात म्हणतो, ही किती लाचारी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपताच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटातील प्रमुख नेते दाखल झाले. खासदार नरेश म्हस्के आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी तातडीने शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मेळाव्यानंतर लगेचच झालेली ही भेट अनेक राजकीय संकेत देत आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नरेश म्हस्केंची टीका
मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. “राज ठाकरेंच्या भाषणात मराठीचा मुद्दा ठळकपणे मांडला गेला, पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात फक्त टोमणे आणि सत्तेची आस दिसली,” अशी टीका त्यांनी केली. त्यांना उद्देशून म्हस्के म्हणाले, “उद्धव ठाकरेंना आता सत्तेसाठी राज ठाकरेंची गरज भासत आहे. मराठी भाषेसाठी ज्या घोषणा दिल्या गेल्या होत्या, त्या फोल ठरल्या आहेत. हिंदी सक्तीवरदेखील ठोस भूमिका मांडली गेली नाही.
‘जय गुजरात’ वादावर प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात जय महाराष्ट्रनंतर ‘जय गुजरात’ उच्चारल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना, नरेश म्हस्के यांनी यावरही स्पष्टीकरण दिलं. शिंदे यांनी जय महाराष्ट्र आधी म्हटले, त्यानंतर ‘जय गुजरात’ म्हटल्याने कुणाचाही अपमान झालेला नाही, असं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय दिला आहे
यावेळी बोलताना म्हस्के यांनी शिवसेना (ठाकरे गट)च्या निवडणूक कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विधानसभेत १०० जागांवर लढून फक्त २० जागा मिळवणाऱ्या पक्षाने आमच्यावर टीका करण्यापूर्वी आत्मचिंतन करावं,” असं सांगत त्यांनी मेळाव्यातील उपस्थितीवरही सवाल उपस्थित केला. या कार्यक्रमात किती आमदार, खासदार, माजी नगरसेवक वा जिल्हाप्रमुख होते, याची यादीच जाहीर करा,अशी मागणी त्यांनी केली.
संजय राऊतांच्या अपेक्षांनाही धक्का?
मेळाव्याच्या निमित्ताने संजय राऊत मोठ्या घोषणांची अपेक्षा करत होते, पण प्रत्यक्षात ती पूर्ण झाली नाही, असंही नरेश म्हस्केंनी स्पष्ट केलं. “मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी अस्मितेला कोणी हात लावू शकत नाही. ही जबाबदारी महायुती पार पाडेल, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
