
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण नगरीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज रविवारी, 6 जुलै) पहाटेपासूनच संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला होता. आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते एकनाथ महाराज समाधी मंदिरात पूजा संपन्न झाली, यानंतर लाखो भाविकांनी संत एकनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले.
भानुदास एकनाथांच्या जयघोषाने आणि टाळ-मृदुंगाच्या गजराने संपूर्ण पैठण नगरी भक्तिमय झाली होती. वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत, भानुदास एकनाथांच्या घोषात भक्त भाविक मंदिर परिसरात दाखल होत होते. यंदा लाखो भाविक संत एकनाथ महाराजांच्या चरणी लीन झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
मंदिर परिसर आकर्षक सजावट आणि प्रशासनाचे चोख नियोजन
मंदिर परिसर सुगंधी फुलांनी, रांगोळीने आणि झेंडूच्या तोरणांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आला होता. भाविकांच्या वाढत्या संख्येचा अंदाज घेऊन मंदिर समिती आणि प्रशासनाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था अनेक सेवाभावी संस्था आणि समाजसेवकांनी मोठ्या संख्येने केली होती.
मंदिर संस्थानच्यावतीने महामार्गावर अनेक ठिकाणी पोलीस मदत केंद्र तैनात करण्यात आले होते. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, स्वतंत्र शौचालय, विद्युत पथदिवे, मंदिराला विद्युत रोषणाई, जागोजागी बॅरिकेट्स आणि दुभाजकांवर जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. दोन्ही ठिकाणी दिंड्या व भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. तसेच मंदिराच्या दोन्ही बाजूला स्वतंत्र मदत केंद्र उभारण्यात आले होते. यंदा प्रथमच मंदिर समोरून भाविक दर्शन घेऊन रस्त्यावर परतण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे गर्दीचे नियोजन अधिक प्रभावीपणे झाले.