
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
साहित्य विश्वात पन्नास वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन *डिंपल पब्लिकेशन* यांच्यामार्फत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या *बिन आडनावाची पोरी* या शीर्षक कथा असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन लवकरच होणार आहे.पालघर जिल्ह्यातील आघाडीचे लेखक व खगोल अभ्यासक श्री. चंद्रकांत घाटाळ यांचे ‘ बिन आडनावाची पोरी’ हे बहु प्रतिक्षित पुस्तक लवकरच प्रकाशित होईल. या पुस्तकात एकूण दहा कथा असून या सगळया कथा सामाजिक परिस्थितीचे वेगवेगळे पैलू उघडतात. यात ‘बिन आडनावाची पोरी’ ही कथा घरात राक्षस जन्माला येणे या अंधश्रद्धेवर आधारित आहे. या कथेचा डॉ.सा. रे. पाटील स्मृति या अतिशय नावाजलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. यातील ‘ ‘पाळी’ ही कथा स्त्रियांच्या मासिक पाळी विषयी गैरसमज व अंधश्रद्धा यावर आधारित आहे. यात ‘वांझोटी’ ही कथा बाळ न होणाऱ्या स्त्रीची व्यथा मांडते.. यांत एक छुपा इतिहास सांगणारी. ‘राणीचे युद्ध’ ही अतिशय वेगळ्याच विषयवार आधारित कथा आहे… तसेच यातील आई, दशानन, राधाचा विरह, वृद्धाश्रमातील आजी, आईची माया या सगळ्याच कथा मनाला चटका लावून जातात.
सदर पुस्तकासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार व लेखक सरदार जाधव यांनी साकारलेले मुखपृष्ठ देखणे आणि कुतूहल जागवणारे आहे. तसेच समाज माध्यमातील प्रसिद्ध व्यासपीठ ईरा च्या संचालिका सौ.संजना इंगळे यांनी या पुस्तकासाठी छानशी प्रस्तावना दिली आहे.
हे पुस्तक अंधश्रद्धा निर्मूलन करून समाज जागृतीसाठी निश्चितच उपयोगी ठरेल. अशी आशा पुस्तकाचे लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी व्यक्त केली .
सदर पुस्तकाचे प्रकाशन पालघर येथे होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.