
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, शेतकरी शेतीच्या कामांना लागले आहेत. मात्र या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करताना लुटमारीला सामोरे जावे लागत आहे. तलासरी तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांकडून खतासाठी सर्रास जादा पैसे उकळले जात असून, कृषी विभाग मात्र गप्प आहे.सरकारी दर २६६ रुपये असलेल्या युरिया खतासाठी दुकानदार ३०० ते ३३० रुपये पर्यंत दर मागत आहेत. शेतकरी आक्षेप घेतात तेव्हा थेट उत्तर दिलं जातं – “आमच्याकडे एवढ्यालाच मिळेल, हवं तर घ्या!” ही सरळसरळ जबरदस्ती असून, त्यामागे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.या जबरदस्तीत आणखी एक टोक गाठले आहे – काही दुकानदार “भात बियाणे घेतल्याशिवाय खत दिले जाणार नाही” अशी अट लावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने बियाणे खरेदी करावे लागत असून, पारंपरिक बियाण्यांची शेती धोक्यात आली आहे. हे सगळं आर्थिक शोषण असून, गरीब व आदिवासी शेतकरी त्यात अडकले आहेत.
शेतकऱ्यांकडून तक्रारी करूनही कृषी अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. तलासरी भागातील शेतकरी दुकानदारां विरोधात लेखी तक्रारी दिल्या असून, व्हिडिओ पुरावे सुद्धा सादर करण्यास तयार आहेत. मात्र आजवर कोणतीही कारवाई याच्या वरती झालेली नाही. हा प्रकार निष्काळजीपणाच नव्हे, तर एकप्रकारची जबाबदारीपासून पलायनच म्हणावे लागेल.
शेतकरी हातात नांगर घेत असताना, दुकानदार मनमानी करत आहेत आणि कृषी अधिकारी मौन धारण करून बसले आहेत. ही केवळ तक्रारीची बाब नाही, तर शेती करणाऱ्या समाजाच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी जर प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत, तर या असंतोषाचा स्फोट होणे अटळ आहे.
“मी बऱ्याच दुकानांमध्ये खत खरेदी करण्यासाठी गेलो असता, मला ३०० ते ३३० रुपयांचा दर सांगण्यात आला. मी यावर कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केलं असून, सर्व दुकानदारांचे व्हिडिओ फुटेज माझ्याकडे आहेत. पण अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आमचं नुकसान होतंय.”
– संतोष रामजी ठाकरे, शेतकरी, तलासरी