
भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांच्या निवृत्तीचे वय 75 वर्षे असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार पक्षाने अनेक नेत्यांना राजकीय करिअरमधून निवृत्तही केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर्षीच 75 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या निवृत्तीवरून विरोधकांकडून सातत्याने भाजपला डिवचले जाते. एकीकडे मोदींच्या निवृत्तीची चर्चा होत असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवृत्तीचा प्लॅन सांगितला आहे.
अमित शाह हे 60 वर्षांचे आहेत. भाजपच्या संकेतानुसार त्यांना निवृत्तीसाठी अद्याप 15 वर्षे बाकी आहेत. पण शहांनी आपल्या निवृत्तीनंतरचा प्लॅन तयारही केला आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सहकाराशी संबंधित महिलांशी ‘सहकार संवाद’ या कार्यक्रमात बोलताना याबाबत मोठे विधान केले आहे.
अमित शाह म्हणाले, मी निर्णय घेतला आहे की, जेव्हा कधी निवृत्त होईन त्यानंतर आयुष्यभर वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेती करेन. नैसर्गिक शेती हा एकप्रकाराचा वैज्ञानिक प्रयोग आहे. त्यामुळे अनेक फायदे होतात. रासायनिक खतांचा वापर केलेला गहू खाल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतात. सुरूवातीला आपल्याला हे कळाले नाही.
रासायनिक खतांचा वापर न केलेले अन्न खाणे, याचा अर्थ आपल्याला औषधांची गरजच भासणार नाही. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन वाढते. माझ्या शेतात मी नैसर्गिक शेतीचा प्रयोग केला आहे. माझ्या शेतीच्या उत्पादनात जवळपास दीड पटीने वाढ झाल्याची माहिती अमित शहा यांनी यावेळी दिली.
जास्तीच्या पावसामुळे तुमच्या शेतीतून पाणी बाहेर जाते. पण नैसर्गिक शेती केली तर एक थेंबही पाणी जाणार नाही. ते जमिनीत मुरते. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीत गांडूळ तयार होतात. तुम्ही रासायनिक खतांचा वापर करून सगळे गांडूळ मारले. प्रत्येक गांडूळ यूरिया, डीएपीचा एकप्रकारे कारखानाच आहे. ते माती खाते आणि खते बनवून बाहेर टाकते. पण आपण जेव्हा यूरिया टाकला आणि गांडून मरून गेले, असे शहांनी सांगितले.
गृह मंत्रालयापेक्षा मोठा विभाग
अमित शहा यांनी यावेळी गृह मंत्रालयापेक्षाही सहकार मंत्रालय त्यांच्यासाठी कसे खास आहे, हेही सांगितले. ते म्हणाले, मी गृह मंत्री झालो तेव्हा सगळे मला म्हणाले की, खूप महत्वाचा विभाग मिळाला आहे. पण जेव्हा मला सहकार मंत्री बनवले तेव्हा मला वाटले की, हा विभाग गृह मंत्रालयापेक्षा मोठा विभाग आहे. देशातील शेतकरी, गरीब, गाव आणि जनावरांसाठी हा विभाग काम करतो.