
सरकारचे नेते त्यांच्या पाठीमागे उभे राहणार; रोहित पवारांचा हल्लाबोल…
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणत्याही लोकप्रतिनिधीने मारहाण करणे चुकीचे आहे.” तर दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड यांनी मात्र, “मी जे काही केलं त्यावर ठाम आहे,” अशी भूमिका घेतली आहे. या घटनेला 35 तास उलटून गेले असले तरी अद्याप संजय गायकवाड यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, “ती फक्त एक छोटीशी मारहाण होती. मला सर्व कायदे माहित आहेत. हे फक्त एनसी (नॉन कॉग्निजेबल) मॅटर आहे. यात शिक्षेची तरतूद कायद्यानुसार बहुतेक नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही
रोहित पवार म्हणाले की, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही. कारण हे सरकार, नेते, पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीमागे हे सरकार उभे राहणार नाही, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
देवेंद्र फडणवीस कधी-कधी खोटं बोलतात
विनाअनुदानित शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केल्यानंतर आता महायुती सरकार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कधी-कधी खोटं बोलतात. ते म्हणतात टप्पा अनुदान आम्ही दिलं नाही. त्यावेळी कोरोना काळ होता, त्यावेळी कसं करणार? तुम्ही दहा बारा वर्ष सत्तेत आहात, तुम्ही काय करताय? तुम्ही मागचे 10 महिने काय केलं? तुम्हाला आधी करता आलं नाही का? मी जाणीवपूर्वक अडीच वाजता निघून गेलो. कारण, तुम्ही राजकारण करणार आणि शिक्षकांना टप्पा अनुदान देणार नाहीत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू
राज्य सरकारने धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “श्रीमंत राजे यशवंतराव होळकर विद्यार्थी विकास योजना” सुरू केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना अत्यंत महत्वाकांक्षी असून, यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये शिक्षण देण्याबरोबरच वसतिगृहाची सुविधा देण्यात येते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे वर्षाला 70 हजार इतकी रक्कम खर्च केली जाते. मात्र, या योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, यशवंतराव होळकर योजना काय सगळीकडेच भ्रष्टाचार सुरू आहे. काम झालं नाही तरी बिले काढली आहेत. केवळ बिले काढून पैसे कमावण्याचे प्रकार सुरु आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.