
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर (प्रतिनिधी) :शिवकालीन लोकजीवन अधिक सुखमय, आनंदमय व एकात्म बनवण्यासाठी लोकभाषा, लोकसंगीत, लोककला, लोकसाहित्य आणि लोकराजा या संकल्पना उदयास आल्या. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य आणि त्यांच्या विचारधारेवर आधारित ‘चला कवितेच्या बनात’ अंतर्गत 340 वा वाचक संवाद कार्यक्रम शिवाजीराव साखरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ. दिनेश दत्तू भिसे यांनी छत्रपती संभाजी महाराज लिखित आणि प्रभाकर ताकवले अनुवादित नायिकाभेद, नखशिख आणि सातशतक या साहित्यकृतीवर सखोल व अभ्यासपूर्ण संवाद साधला.
डॉ. भिसे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, छत्रपती शंभूराजांचे बालपण उत्तर भारतात गेले. तेथील लोकजीवनावर आणि ब्रज भाषेतील गोकुळीचा राणा श्रीकृष्णाच्या लीलांचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि साहित्यावर दिसून येतो. परिणामी शंभूराजांचे साहित्य भक्तिरस, शृंगाररस आणि तत्वज्ञानाने समृद्ध आहे. त्यांच्या सातशतक या ग्रंथातून त्यांची अध्यात्मिक श्रद्धा व चिंतन स्पष्ट दिसते.
संभाजी महाराजांना संस्कृत, फारसी, हिंदी आणि मराठी अशा अनेक भाषा अवगत होत्या. त्यांनी सातशतक हा ग्रंथ ब्रज भाषेत लिहिला असून शंभू, शंभूनृपवर, शंभूवर्मन या टोपणनावांनी लेखन केले. डॉ. भिसे यांनी नायिकाभेद या संकल्पनेचा उलगडा करत तिचे विविध प्रकार सांगितले तसेच नखशिख या शृंगार रसप्रधान काव्यावरही प्रकाश टाकला.
डॉ. भिसे यांनी स्पष्ट केले की पराक्रमी व्यक्तींच्या जीवनात शृंगार रस हे भूषण असते. मात्र काही विकृत प्रवृत्तीचे लोक जाणूनबुजून संभाजी महाराजांच्या साहित्याचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करतात. तरीही तीनशे वर्षांपासून दडपून ठेवलेले हे मौल्यवान साहित्य आज प्रकाशझोतात येत आहे, ही गोष्ट समाजासाठी अभिमानाची आहे.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी सहभाग घेऊन सखोल चर्चा केली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना शिक्षक नेते शिवाजीराव साखरे यांनी संभाजी महाराजांचे बहुभाषिक साहित्य, त्यांचा जीवनक्रम आणि त्यांच्या सृजनशीलतेवर प्रकाश टाकत डॉ. भिसे यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी मुरलीधर जाधव यांनी केले. संवादकांचा परिचय सौ. कांचनताई भिसे यांनी करून दिला तर आभार हणमंत म्हेत्रे यांनी मानले.