
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी : अनिल पाटणकर
पुणे : आषाढी एकादशी निमित्त भारती विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंगरंग’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमातून प्रत्यक्ष वारीचा अनुभव मिळाला असे प्रतिपादन भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांनी केले. भारती विद्यापीठाच्या कोथरूड शैक्षणिक संकुलातील स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् महाविद्यालयाच्या वतीने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभंगरंग’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आज प्रयोग कलांमधील एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ला ओळखले जाते. महाविद्यालयात शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या व प्रथितयश कलाकार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या नागेश आडगावकर, सुरंजन खंडाळकर व नंदिनी गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई रचित विविध अभंगांचे व गौळणींचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. साथसंगत देखील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच केली.
“भक्तीरंगात रंगवून टाकणारा, प्रत्यक्ष वारीला गेल्याचा अनुभव देत स्वर आणि ताल शब्दांच्या संयोगातून प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम कधी थांबू नये असे वाटत होते, असे गौरव उद्गार कदम यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निरुपण ह. भ. प. गणेश महाराज भगत यांनी केले. या कार्यक्रमास संचालक प्रा. शारंगधर साठे, अधिकारी, प्राध्यापक, संगीत विभाग प्रमुख डॉ. प्रवीण कासलीकर, नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठाकूर उपस्थित होते