
■ दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी -समिर शिरवडकर
रत्नागिरी.
राजापूर – ( जैतापूर ) जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत सन्मान आमदार चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ व २७ जुलै २०२५ रोजी काझी मल्टीपर्पज हॉल, होळी, जैतापूर (जिल्हा रत्नागिरी) येथे होणार आहे.या स्पर्धेमध्ये एकूण सात गटांमध्ये सामने खेळवले जाणार असून, त्यामध्ये पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट आणि किशोरी गट यांचा समावेश आहे. ही जिल्हास्तरीय दुसरी मानांकन स्पर्धा असून, यासाठी सर्व खेळाडूंनी २०२५-२६ या वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनकडे ५० रुपयांची नोंदणी फी भरावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटांसाठी १०० रुपये इतकी असणार आहे. प्रत्येक गटात किमान आठ स्पर्धकांची नोंदणी आवश्यक असून, संख्या अपुरी असल्यास संबंधित गटाची स्पर्धा रद्द करण्यात येईल.
सर्व स्पर्धकांनी आपली प्रवेशिका बुधवार, २३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासह जमा कराव्यात. खेळाच्या वेळी सर्व खेळाडूंना पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करणे बंधनकारक असणार आहे. स्पर्धेत पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्ड व तीन सेट पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत.या स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच श्री. साईप्रकाश कानीटकर, राज्यस्तरीय पंच श्री. सागर कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून श्री. एकनाथ पाटील हे कार्य पाहणार आहेत.प्रत्येक तालुक्यासाठी तालुका प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, ते प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहेत. (नावे व संपर्क क्र. यथास्थित देता येतील.)
या स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिक, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, सचिव राकेश दांडेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, खजिनदार सुनिल करगुटकर, सहसचिव प्रसाद माजरेकर, तसेच रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी प्रदिप भाटकर, सुरेंद्र देसाई, सुचय रेडीज, मिलिंद साप्ते, नितीन लिमये यांनी स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.