
विधानसभेच्या २०२४ निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनीही अखेर पक्षाचा हात सोडला असून १६ जुलै रोजी ते भाजपात प्रवेश करणार आहेत.हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार असून सासवडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे.
संजय जगताप यांनी २०१९ ते २०२४ या कालावधीत पुरंदर मतदारसंघाचे आमदार म्हणून काम पाहिले. मात्र २०२४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये याच विजय शिवतारेंना संजय जगताप यांनी हरवलं होतं.
जगताप यांच्याआधी संग्राम थोपटे आणि रविंद्र धंगेकर या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसची गळती अधिकच गंभीर होत चालली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसची कोरडी होत चाललेली संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वातील अनिश्चितता यामुळे पक्षातील अनेक नेते भविष्याचा विचार करून भाजपकडे वळत आहेत.