
नेमकं काय म्हणाले ?
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भुमीपूजन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते (ता. २७) झाले. यानिमित्ताने सरन्यायाधीश भूषण गवई पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते.
यावेळी आपल्या भाषणात सरन्यायाधीश गवई म्हणाले, नाशिक जिल्हा न्यायालयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, त्यांनी उद्घाटनही आपल्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. उद्घाटन कार्यक्रमाला आपण दोघे उपस्थित राहू, असे त्यांनी म्हटले होते. खरे तर उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे परंतु उद्धवजी माझ्यासोबत नाहीत, खरं म्हणजे योग नव्हता असे सांगत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उद्धव ठाकरे यांची आठवण काढली.
सरन्यायाधीश पुढे म्हणाले, खरं तर कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात, मात्र, ही सुंदर इमारत प्रत्येकाने नक्की पाहिली पाहिजे, अशा शब्दांत सरन्यायाधीश श्री गवई यांनी इमारत बांधकामाचे कौतुक केले. नाशिक न्यायालयाला 140 वर्षाची परंपरा आहे. येथे हेरिटेज कक्ष निर्माण केला आहे. अतिशय उच्च अशी परंपरा या न्यायालयाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांविषयी चर्चा होते. येथील पायाभूत सुविधा या निश्चितपणे चांगल्या आहेत. देशातील सर्व जिल्हा न्यायालय इमारतींमध्ये ही इमारत अतिशय सुंदर अशी आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असताना या इमारतीच्या भूमिपूजनाला उपस्थित होते आणि आपल्याच हस्ते उद्घाटन होणे आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही गौरवोद्गार काढले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. न्यायालयांच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी अतिशय सहकार्य केल्याचे गवई म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील गवईंनी कौतुक केले.
दरम्यान गवई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संविधान उद्धेशिकेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमावेळी नाशिक वकील संघाने तयार केलेला माहितीपट दाखविण्यात आला. तसेच हेरिटेज बोर्डचे अनावरण तसेच हेरिटेज बुकचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर, न्या. रेवती डेरे मोहिते, न्या. एम.एन. सोनम, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. ए.एस. गडकरी, न्या. मकरंद कर्णिक आदींसह नाशिक वकील संघचे अध्यक्ष ॲड नितीन ठाकरे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, ॲङ अविनाश भिडे यांचेसह बार कौन्सिल व वकिल संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.