
रेल्वे भरतीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे, रेल्वेकडून परीक्षेच्या काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या नव्या नियमानुसार आता उमेदवारांना आपल्या धार्मिक प्रतिकांसह परीक्षा देता येणार आहे.
याबाबत रेल्वेकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. रेल्वेच्या नव्या नोटिफिकेशननुसार हातात कडं, धागा, डोक्याला पगडी, यासारख्या विविध धार्मिक प्रतिकांसह परीक्षार्थ्यांना रेल्वे भरतीची परीक्षा देता येणार आहे. मात्र हा नियम फक्त रेल्वेशी संबंधित परीक्षेसाठीच लागू असणार आहे.
सुरुवातीला रेल्वेकडून कोणतंही धार्मिक प्रतिक परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती, या मागे रेल्वेचा असा उद्देश होता की, एखादा उमेदवार त्यामध्ये एखादं इलेक्ट्रॉनिक गॅझेट देखील लपवू शकतो, त्यामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असते, परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीनं व्हावी यासाठी रेल्वेनं परीक्षा केंद्रांमध्ये धार्मिक प्रतिक असलेली कोणतीही वस्तू घेऊन जाण्यास मनाई केली होती. मात्र त्यानंतर आता उमेदवारांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन रेल्वेकडून या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे.
रेल्वेकडून या नियमात बदल केल्याचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे, मात्र त्याचसोबत असं देखील म्हटलं आहे की, कोणत्याही उमेदवारांना आपल्या धार्मिक प्रतिकांसोबत परीक्षा केंद्रात तेव्हाच प्रवेश मिळेल जेव्हा संबंधित उमेदवार हा तेथील तपास यंत्रणेला संपूर्णपणे सहकार्य करेल. कारण परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर आलेल्या उमेदवारांचं व्हेरिफिकेशन पूर्वी प्रमाणेच होणार आहे.
नियम का बदलला?
नुकतीच कर्नाटक राज्यात रेल्वे भरतीची परीक्षा पार पडली, ही परीक्षा देण्यासाठी आलेल्या काही उमेदवारांच्या हातातील धार्मिक प्रतिक असलेला धागा काढून टाकण्यात आला होता. पंजबामध्ये देखील असाच प्रकार घडला होता, त्यानंतर या विरोधात विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले, विद्यार्थ्यांचा वाढत असलेला विरोध पाहून अखेर रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या या नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक प्रतिकांसह रेल्वेची परीक्षा देता येणार आहे, याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.