
काय आहे नेमकं प्रकरण ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वरळी डोममधील भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 5 जुलै रोजी झालेल्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) यांच्याकडे थेट तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाषणातील काही विधानांवर आक्षेप घेत राज ठाकरे यांनी हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्रिभाषा धोरणावरून राज्यात गेल्या काही महिन्यांत वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाला प्रचंड विरोध झाला. नंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला आणि त्यानंतरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत एक विजयी मेळावा वरळी डोम येथे 5 जुलैला आयोजित केला होता.
या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी काही ठिकाणी हिंसेचा उल्लेख करत मारहाणीचे समर्थन केल्यासारखे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे डीजीपींना अधिकृत तक्रार मिळाल्याचं समजत आहे.
राज ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना म्हटलं होतं, ‘काल एका व्यापाऱ्याच्या कानफडात मारली. त्याच्या माथ्यावर लिहिलं होतं का गुजराती? बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. अजून काही केलं नाही. त्यांना मराठी आली पाहिजे. ऊठसूट मारायची गरज नाही, पण जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे.
यावर त्यांनी पुढे स्पष्ट केलं होतं की, ‘पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि अशा वेळी व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही, मार खाणारा सांगतो.’
राज ठाकरे यांच्या या विधानांमुळे समाजात हिंसेला प्रोत्साहन मिळण्याची भीती असल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, ‘व्हिडीओ काढू नका’ हे वक्तव्य हे खुल्या सार्वजनिक व्यासपीठावरून मारहाणीच्या घटनेला समर्थन देणारे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे सामाजिक शांततेला बाधा निर्माण होण्याचा धोका आहे, असंही तक्रारीत नमूद आहे.
हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या वातावरण संवेदनशील झालं आहे. काही दिवसांपूर्वी भोजपुरी अभिनेते पवन सिंग यांनी मराठी बोलण्यावरून वाद निर्माण केला होता. त्यानंतर मनसेने जोरदार आंदोलन केले आणि सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं हे वक्तव्य आणि त्यावर झालेली तक्रार, आगामी राजकीय वातावरणावर मोठा परिणाम करू शकते.