
शिंदे गटाच्या बड्या नेत्याची उघड नाराजी !
शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे शिंदे गटाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याचं देखील बोललं जात होतं. शिवसेनेकडून दोन वेळा लोकसभेची उमेदवारी मिळून देखील गोडसे नाराज असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.
अखेर हेमंत गोडसे यांनी स्वत: पुढे येत आपण नाराज असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच शिंदे गटात पक्षांतर्गत शिस्त नसल्याचंही म्हटलं आहे.
हेमंद गोडसे यांनी म्हटलं की, मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. शिंदे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही. मी याबाबत मांडणी केली आहे, मात्र जे सांगितले त्यावर चर्चा होत नाही. पद वाटप आणि संघटन, नियुक्त्या आणि योग्य व्यवस्था नाही. जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या त्या संघटनेत लक्ष घालायला पाहिजे, तर संघटना मजबूत होते, असं म्हणत त्यांनी दादा भूसेंवर नाराजी व्यक्त केली.
संघटनेला ताकद द्यायला पाहिजे, एकटे शिंदे साहेब काम करू शकत नाहीत. त्यांचा भार कमी केला पाहिजे. गुणवत्तेवर पदाधिकारी नेमले पाहिजे. एखाद्या पक्षात शिस्त असली की गटबाजी होत नाही. चर्चा चव्हाट्यावर जायला नको. तसेच भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असंही हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केलं.
भाजपमध्ये संघटन चांगले आहेत. तसे आपल्या पक्षात व्हायला पाहिजे असे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांना मी सांगितले आहे. सामाजिक काम घेऊन मी श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना शिंदे साहेब न्याय देतील. काही विषय जिल्हा पातळीचे असतात. लहान विषयांसाठी राज्य पातळीवर जाण्याची गरज नको, असं देखील हेमंत गोडसे यांनी म्हटलं.