
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र आहे, असे भाषण चार महिन्यांनंतर सुरू होईल. त्यामुळे मी आताच सांगतो की, मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप किंवा आजा आला तरी हे कोणाच्याने होणार नाही.
हजारो पिढ्या मुंबई महाराष्ट्राची राहील. महाराष्ट्रात मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, येत्या चार महिन्यांत मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी मराठीचा मुद्दा तापला आहे. येणार्या निवडणुकीतही ‘उबाठा’ शिवसेनेकडून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षड्यंत्र असल्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असे संकेत देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच सभागृहात भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, लोक वर्ष-दीड वर्षाने मुंबईत येतात तेव्हा बदललेली मुंबई पाहायला मिळते. अण्णा भाऊ साठे यांनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती दुसर्या कोणाच्या वाट्याला येऊ नये; पण चार महिन्यांनंतर भाषणे सुरू होतील की, महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यामुळे आताच सांगतो की, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही.
मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहील. महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. यानिमित्ताने आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दिशेने राज्य सरकार काम करत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
ना हनी, ना ट्रॅप
या अधिवेशात ‘हनी ट्रॅप’चा मुद्दा गाजला; पण मुख्यमंत्र्यांनी असले कोणतेही ‘हनी ट्रॅप’ प्रकरण माझ्यापर्यंत आलेले नाही, नाना पटोलेंनी म्हणे बॉम्ब आणला; मात्र तो बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. तुमच्याकडे असला तर तो आमच्याकडे द्या, असे सांगत ना हनी आहे, ना ट्रॅप, यासंदर्भात कोणतेही पुरावे नाहीत,अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हे प्रकरण चर्चेत आल्याने आजी-माजी मंत्री सगळे एकमेकांकडे पाहू लागले आहेत; पण कुठल्याही आजी-माजी मंत्र्याचे ‘हनी ट्रॅप’ प्रकरण नाही. एका उपजिल्हाधिकार्याच्या संदर्भात नाशिक येथे तक्रार केली होती, ती त्या महिलेने मागेही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या व्यक्तीबाबत नाना पटोले वारंवार उल्लेख करत आहेत तो काँग्रेस पक्षाचा माणूस आहे. तुम्ही व्यवस्थित पुरावे आणा आणि मग आरोप करा. उगाच साप साप म्हणून भुई धोपटायचे काम करू नका. हे योग्य नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.