
मीरा भाईंदरमध्ये अमराठी भाषिक व्यापाऱ्यांनी मारहाणीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढाला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं देखील मोर्चा काढला. मनसेच्या या मोर्चानंतर आज पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली.
या सभेत राज ठाकरे काय बोलणार? नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे. कानावर मराठी समजणार नसेल तर कानाखाली बसणारच असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंमत बघा कशी होते यांची. तुम्ही काही बोलला तर राष्ट्रीय बातमी होते. पण हे काही बोलतात तेव्हा त्यांना माहीत असतं सरकार आमच्या मागे आहे. सरकारच या गोष्टी लादणार असेल तर या लोकांची हिंमत वाढणारच आहे. तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात. आमची सत्ता रस्त्यावर आहे. हा महाराष्ट्र आहे. तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. परत कोणी वेडावाकडा वागण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गाल आणि हात या सर्व गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही.
काही सरकारी आणि काही बेरोजगार पत्रकार असतात. युट्यूबवर जातात आणि म्हणतात ही फडणवीसांनी दिलेली दिलेली स्क्रिप्ट आहे. हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे जो स्वत:चा अपमान लिहितो? असं म्हणत त्यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात. कोणाच्या दबावाखाली. कोण दबाव टाकतं तुमच्यावर. केंद्राचं हे धोरण पूर्वीपासूनचं आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यासाठी प्रचंड मोठा लढा द्यावा लागला. मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा काही गुजराती व्यापारी आणि नेत्यांचा डाव होता, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.