
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा; ‘दिवटे’ शब्दप्रयोग कुणासाठी ?
नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामना दैनिकासाठी संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे.
हिंदीसक्तीच्या अध्यादेश मागे घेतल्यावर ५ रोजी झालेल्या मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी शिंदेवर टीका केली होती. एकनाथ शिंदेंनीही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. आता या मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत थेट इशारा दिला आहे.
शिंदेंना चोख प्रत्युत्तर
मी पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार केला पाहिजे, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला होता. आता यावरून उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेतत्यांची अर्धी दाढी राहिलीय हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील, राहिलेली अर्धी दाढीही काढतील, असं म्हणत चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक
तसेच या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेदांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडले आहे. याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही.
…त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पक्षाला मोठी गळती लागली आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो, असं ते म्हणाले आहेत. तसेच त्यांनी पक्षातून गेलेल्यांना जोरदार टोलाही लगावला आहे. आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पक्षातून गेलेल्यांना सुनावलं आहे.