
उद्धव ठाकरेंचा बडा नेता सगळंच खरं बोलून गेला…
माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रचंड आग्रही होते. त्यांच्या नावासाठी सगळी फिल्डिंगही लावण्यात आली होती.
मात्र, हेही महाराष्ट्र विधिमंडळाच्या याही पावसाळी अधिवेशनाचे सूप विरोधी पक्षनेतेपदाविनाच वाजले. आता याचवरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या नेत्याने भास्कर जाधवांबाबत खळबळजनक दावा केला आहे.
महायुती सरकारला 232 आमदारांचा पाठिंबा असून दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीकडे अवघ्या 46 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे गेल्या सात ते आठ महिन्यांपासून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिक्त आहे.
महायुती सरकारकडून या पावसाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र,या पदासाठी इच्छुक असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या स्वप्नांवर अखेर महायुती सरकारनं पाणी फेरलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊतांनी शनिवारी (ता.19) गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जाणूनबुजून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर केलं नसल्याचा हल्लाबोल केला आहे. भास्कर जाधवांची आक्रमकता पाहून विरोधी पक्षनेतेपद देण्यास टाळाटाळ केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.
माजी खासदार विनायक राऊत म्हणाले,भाजपने किंवा सत्ताधारी पक्षानं हेतुपूर्वक आणि जाणीवपूर्वक किंवा द्वेष म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलेलं नाही.यावेळी त्यांनी नितेश राणेंवरही टीकेची झोड उठवली. त्यांनी राणेंना एकमेकांमध्ये वाद लावण्याचं कळत असल्याचा टोलाही लगावला.
यावेळी विनायक राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. पण हेच भाजप किंवा सत्ताधारी पक्षांच्या डोळ्यात खुपल्याचा घणाघातही माजी खासदार राऊतांनी केला.
भास्कर जाधव यांची आक्रमकता,अभ्यास आणि राजकीय अनुभव हा त्यांना भारी पडेल म्हणून सत्ताधारी विरोधी पक्षनेतेपद जाहीर करायला तयार नसल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी इच्छुक असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मात्र, त्यांच्या नाराजीचे कारण वेगळेच असल्याची चर्चा रंगली असून त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला ‘मातोश्री’कडून हिरवाकंदील मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडीकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस असणारे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले होते. त्यावर योग्यवेळी निर्णय घेऊ, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे या अधिवेशनात भास्कर जाधव यांची निवड होण्याची शक्यता गृहीत धरली होती. त्यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली नसतानाही जाधव यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले होते.