
50 लाख जमवले पण व्हायचं तेच झालं; कॉमेडियनच्या जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ…
तेलुगू सिनेमातील दिग्गज अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे शुक्रवारी (दि.18) निधन झाले. पडद्यामागे त्यांना वेंकट राज या नावाने ओळखले जात होते. ते 53 वर्षांचे होते.
हैदराबादमधील एका रुग्णालयात मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. ते गेल्या अनेक महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. अलीकडे त्यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. या बातमीनंतर संपूर्ण तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
काही काळापूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, कुटुंबीयांना या वैद्यकीय उपचाराचा खर्च पेलवणार नव्हता. सतत डायलिसिस आणि व्हेंटिलेटरवर ठेवूनही वेंकट यांची तब्येत अधिकच बिघडत गेली आणि अखेर त्यांना मृत्यूला शरण जावं लागलं.
ट्रान्सप्लांटचा खर्च होता 50 लाख रुपये
या महिन्याच्या सुरुवातीला, जेव्हा त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदतीसाठी समाजातून आवाहन केलं. फिश वेंकट यांच्या मुलीने सांगितले होते, “पप्पांची तब्येत खूपच नाजूक आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवले आहे. त्यांना किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे, ज्यासाठी 50 लाख रुपये खर्च येणार आहे.”
प्रभासच्या मदतीबाबत आले दोन परस्परविरोधी वक्तव्य
फिश वेंकट यांच्या मुलीने वन इंडिया या माध्यमाला सांगितले की, अभिनेता प्रभासच्या टीममधून कुणीतरी त्यांच्याशी संपर्क केला आणि किडनी ट्रान्सप्लांटच्या खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. ती म्हणाली, “पप्पांना तात्काळ ट्रान्सप्लांटची गरज होती, त्याचवेळी प्रभासचे असिस्टंट आमच्याशी संपर्कात आले आणि आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.” मात्र, नंतर सुमन टीव्हीशी बोलताना वेंकट यांच्या एका नातेवाइकाने हे स्पष्टीकरण दिले की, त्या कॉलचा कोणताही आधार नव्हता आणि तो बनावट होता. “प्रभासला याबद्दल काहीही माहिती नाही. आम्हाला अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही,” असं त्या नातेवाइकाने स्पष्ट केलं.
खलनायक ते विनोदी कलाकार – फिश वेंकट यांचा प्रवास
1971 साली आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणम येथे जन्मलेले फिश वेंकट यांनी 2000 साली आलेल्या ‘सम्मक्का सारक्का’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक निगेटिव्ह भूमिका केल्या, पण नंतर ते एक यशस्वी कॉमेडियन म्हणून नावारूपाला आले. त्यांचा शेवटचा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कॉफी विथ अ किलर’ हा विनोदी चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन आर. पी. पट्नायक यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.