
सत्यजीत तांबे म्हणाले; निषेधार्थ अन् तातडीनं दिल्लीला जा !
राज्यातील सर्व शाळांमध्ये आता केंद्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर आधारित ‘एनसीईआरटी’चा अभ्यासक्रम लागू होणार असल्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ 68 शब्दांत उल्लेख असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत यावर लक्षवेधी उपस्थित करताना हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘CBSE’मध्ये 2200 पानांपैकी फक्त 68 शब्दांत असल्याचा निषेध आहे. एवढ्या गंभीर मुद्यावर सरकारतर्फे तातडीने दिल्ली जायला पाहिजे होते. केंद्रीय मंत्र्यांसमोर बसून हा निर्णय करून घ्यायला पाहिजे होता. भाजप महायुती सरकार यामध्ये उदासीन दिसत आहे’, असा टोला आमतदार तांबे यांनी लगावला.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेशCBSE अभ्यासक्रमात व्हावा, यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले. परंतु, CBSEच्या इतिहास विषयात 2200 पानांपैकी फक्त 68 शब्द छत्रपती महाराजांवर आहेत, हे अत्यंत निषेधार्ह आहे! CBSE च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासला पाहिजे, अशी अपेक्षा आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एकूण 2200 पाने असूनही छत्रपती शिवराय यांचा फक्त 68 शब्दांत उल्लेख करण्यात आला आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवला गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत सभागृहात मांडली.
शिवराय यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. मात्र, अभ्यासक्रमात केवळ नावापुरता उल्लेख करून त्यांच्या कार्याचा अवमान करण्यात आला आहे. राज्य सरकारने याबाबत अधिक जबाबदारीने भूमिका घ्यावी. राज्य शिक्षण संशोधन परिषदेकडून (एससीईआरटी) केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला, तरीही मंत्री स्वतः दिल्लीला जाऊन पाठपुरावा केला असता, तर योग्य ठरले असते, असेही मत सत्यजीत तांबे यांनी मांडले.
तांबेंना दिल्लीला घेऊन जाणार
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान अभ्यासक्रमात व्हायलाच हवा”. या विषयावर अधिक ठोस पाठपुराव्यासाठी आम्ही सर्व जण आमदार तांबे यांच्यासह दिल्लीला जाऊ, असं आश्वासनही दिले.
दादा भुसेंची प्रतिक्रिया…
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली असून, सातवी आणि दहावी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये शिवरायांचा सन्मानपूर्वक समावेश व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्याचे सांगितले.