
ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अनेक बँड वाजताहेत. कारण त्यांना स्वतःशिवाय देशात कोणतंही अन्य नाव नको आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर करायला लागले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चौफेर टीका केली आहे. ठाकरे हा नुसता ब्रँड नाही तर महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदू अस्मितेची ओळख असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावरही भाष्य केले. ते म्हणाले की, ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाही. ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करायचे आणि मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढे (एकनाथ शिंदे) आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण शिवसेना हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकार नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? असा सवाल करत ते म्हणाले, या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, त्या धोंड्यानं बेकायदेशीर केलंय. ‘शिवसेना’ हे नाव त्याला दुसऱ्याला देता येत नाही. ते त्याच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे, पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसल्याने सध्या चालून जातंय. पण लोक कोणत्याही धोंड्याचं ऐकणार नाही. शेवटी चोरीचा माल आहे. चोरुन मतं मिळवलीत आणि त्यावर मर्दुमकी गाजवत असलात तरी चोर तो चोरच, असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनाही डिवचलं.