
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपत आहे. याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ विधान परिषदेत पार पडला.
त्यांच्या निरोप समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला होता. त्यावर ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटोसेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं होतं आणि बाजूला बसणं देखील टाळलं होतं. पण अंबादास दानवे यांना दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा आहे. तसं वक्तव्य दानवे यांनी केलं आहे.
अंबादास दानवे यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत संबंधित वक्तव्य केलं आहे. अंबादास दानवे यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा आहे, असं मोठं वक्तव्य केलं आहे.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले ?
मी तेवढा मोठा नाहीय. पण निश्चित मी त्यादिवशी सुरुवातीलाच म्हटलं की, मनाला वेदना झाल्या. जी संघटना अखंड ताकदवान होती, ठीक आहे, सत्तेत बसणं वगैरे, आम्ही काय सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता येईल आणि जाईल. पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना मनाला आणि हृदयाला झालेल्याच होत्या. या वेदना कधीना कधी भरुन निघाव्यात असं मनाला वाटत असतं. सगळे एकत्र असले पाहिजे. सगळे लोकं असले पाहिजेत. कारण आपल्या शिवसेनेचं राज्य असलं पाहिजे. आपली महाराष्ट्रात ताकद असली पाहिजे, असं मला शिवसैनिक म्हणून वाटतंच. आशा ठेवायला काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
मी कुणाविषयी वैयक्तिक सल ठेवणार नाही. पण मनाला ही सल कायम आहे की, आपली एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली. तिला कुणाची तरी दृष्ट लागली. संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच माझी इच्छा आहे, असं अंबादास दानवे म्हणाले.