
शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते, शासन शेतकऱ्यांना १ रुपया देत नाही. म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही, असे विधान राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. एक रुपयाची किंमत फार कमी आहे, पण यामुळे पाच ते साडे-पाच लाख बोगस अर्ज सापडले.
हे माझ्याच काळात सापडले. मी बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्याचे कोकाटे म्हणाले.
एक रुपयात पीक विमा योजना आणली, परंतु काही लोकांनी त्याचा गैरवापर केला, असे वक्तव्य काही महिन्यांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
यावर बोलताना कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे. माझ्या काळात आतापर्यंत ५२ जीआर काढण्यात आले, इतकी कामे मी कृषी खात्याच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मी जाऊन आलो, शेतावर गेलो, बांधावर गेलो, प्रत्येक संशोधन केंद्रात जाऊन आलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाहीत, तेथे सुविधा देण्याचे आश्वासन मी दिले आहे. आतापर्यंत एकही कृषीमंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही.
मी विद्यापीठांना भेटी दिल्या, संशोधन केंद्रांना भेटी दिल्या, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यात वेगवेगळे जीआर काढले. प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्र निर्माण व्हावे, ही देखील माझीच मागणी आहे. शेतकऱ्यांच्या ज्या-ज्या अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रचंड मोठा बदल कृषी विभागात बघायला मिळेल, असे मी आपल्याला आश्वासन देतो. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आहे. मग हे उगाचच येतो आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.