
दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी -विकी जाधव
—————————–
मुंबई, दि. २२ राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने २२ जुलै रोजी राज्यभरात विक्रमी १०२ ठिकाणी एकाच दिवशी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले. या पंडित दीनदयाळ उपाध्याय राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात तब्बल ५७,००० तरुणांनी नोंदणी केली, तर २७,००० हून अधिक तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळवून देण्यात यश आले.
या उपक्रमाचे औचित्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने साधण्यात आले. मुंबईतील गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे आयोजित प्रमुख रोजगार मेळाव्यात राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उद्घाटनप्रसंगी भाष्य केले.
> “राज्याच्या तरुणांना दिशा देणारा आणि त्यांच्या करिअरमध्ये नवा अध्याय सुरू करणारा हा उपक्रम आहे. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन, रोजगार हा एकमेव उद्देश न ठेवता, तरुणांच्या आत्मविश्वास व आत्मनिर्भरतेसाठी शासन सतत कार्यरत आहे,” असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.
या विशेष मेळाव्यात २५ आस्थापनांनी सहभाग नोंदवला असून, यामध्ये पाच शासकीय महामंडळांचाही समावेश होता. फक्त गावदेवी येथील कार्यक्रमात ५०० हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली.
मेळाव्यादरम्यान औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजिस्टिक्स, व्यवस्थापन व सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमाच्या यशस्वीतेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व शारदा मंदिर हायस्कूल यांचे विशेष योगदान होते.
कार्यक्रमास कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त शैलेश भगत, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विद्या शिंगे, मुकेश संखे आदी उपस्थित होते.
केवळ रोजगार उपलब्ध करून देणे नव्हे, तर तरुणांना शासकीय योजनांची माहिती देणे, स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करणे हेही या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य होते.
मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात येत्या काळात असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील, असे संकेत मंत्री लोढा यांनी दिले.