
विधीमंडळाच्या सभागृहात ऑनलाइन रमी खेळताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समोर आणल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याीची मागणी केली होती.
मात्र माणिकराव कोकाटे यांनी आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून ते माणिकराव कोकाटेंवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या जागी इतर कोणालातरी कृषीमंत्री बनवण्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेप्रकरणी आता रोहित पवार यांनी अजित पवारांना विनंती करणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यात माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यांना पत्ते खेळायचे असतील त्यांनी घरी खेळावे किंवा इतर कुठेही खेळावे. पण विधीमंडळामध्ये तुम्ही उपस्थित असताना आणि मंत्री असताना तुमच्यावर त्याठिकाणी शेतकऱ्याची आणि कष्टकऱ्याची जबाबदारी आहे. विधीमंडळात त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा पत्ते खेळत असाल. त्यानंतर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याची भाषा करतात. हा अहंकार तुम्ही थोडा बाजूला ठेवा. तुम्ही शेतकऱ्याला आणि सरकारला भिकारी म्हटला आहात. त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. तुमचे नेते याबाबतीत काय करतात हे बघावं लागेल. पण अजित पवारांना मला विनंती करायची आहे की, माणिकराव कोकाटे याचं खातं बदला आणि त्याठिकाणी दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला बसवा किंवा तुम्ही स्वत: कृषीविभागाची जबाबदारी घ्या, अशी विनंती मी अजित पवारांना करतो. कारण माणिकराव कोकाटे कृषीविभागाचे प्रमुख राहिल्यामुळे आज शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, असा दावा त्यांनी केला.
अजित पवारांवर ज्यावेळी आरोप झाले होते, त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र आता ते आपल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत, असे वाटते का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते, ते खोटे आरोप होते. पण आरोप झाले होते, त्यावेळी अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अजित पवार कराडला गेले होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीठिकाणी बसून अजित पवार शांततेत बसले होते. पण अजित पवार आता स्वत: या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.