
सुनील तटकरे स्पष्टच बोलले !
विधिमंडळात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. ‘पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही’, असे विधान त्यांनी केले.
त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधक पुन्हा एकदा तुटून पडले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट भाष्य केले.
पत्रकारांशी बोलाताना सुनील तटकरे म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलणे झाले नाही. मी दौऱ्यावर होतो, आत्ताच परत आलो. माणिकराव कोकाटे यांचे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही. परंतु, जबाबदार नेतृत्वाने खूप विचारपूर्वक वक्तव्ये केली पाहिजेत, असे मला वाटते, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली असली तरी…
विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर मला काही बोलायचे नाही.माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतील. सशक्त लोकशाहीत प्रत्येकजण आपापले काम करत राहतो. विधानभवनात जे काही घडते, त्यावर अध्यक्षांचे लक्ष असते. विधानभवनाच्या परिसरातील सर्व घडामोडी या विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींच्या नियंत्रणात येतात. माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ कोणी चित्रित केला त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष तपास करतील. परंतु, ती गोष्ट उचित नव्हती. सभापती महोदय व अध्यक्षांनी याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. कदाचित त्यांनी चौकशी करण्यास सुरुवातही केली असेल. अलीकडे घडलेल्या घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विधान मंडळाच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या आहेत, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोकाटे काय बोलले, हे मी पाहिले नाही; पण मंत्र्यांचे असे वक्तव्य दुर्दैवी आहे. दरवर्षी ५ हजार कोटी याप्रमाणे येत्या पाच वर्षात २५ हजार कोटींची गुंतवणूक आपण शेतीमध्ये करीत आहोत. त्यामुळे मंत्री असणाऱ्याने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.