
हडपसर रेल्वे टर्मिनलकडे जाणाऱ्या जोडरस्त्यांच्या रुंदीकरणात बाधित क्षेत्राचा ताबा तातडीने घेण्यासह, रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे आणि अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले आहेत.
दिवटे यांनी बुधवारी या रस्त्यांची पाहाणी केली. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अप्पर रेल प्रबंधक पद्मसिंह जाधव. रेल्वेचे अधिकारी संजय लव्हात्रे या वेळी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाकडून हडपसर रेल्वे स्थानकावर रेल्वे टर्मिनल विकसित करण्यात येत आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर येणारा ताण कमी करण्यासाठी हे टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे या स्थानकावरून दक्षिणेसह, उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या स्थानकाकडे जाणारे रस्ते रुंदीकरण करण्याच्या सूचना राज्य शासन, तसेच केंद्राने महापालिकेस दिल्या आहेत. त्याअंतर्गत मुंढवा ताडीगुत्ता चौक ते हडपसर रेल्वे स्टेशन, तसेच हडपसर रेल्वे स्टेशनच्या उत्तर व दक्षिण बाजूकडील अस्तित्वातील व नियोजित रस्त्यांची जागा पाहणी अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी केली.
यावेळी रस्ता रुंदीकरण क्षेत्रातील मिळकतधारकांची बांधकामे, तसेच रस्त्याच्या आखणी बाधित क्षेत्रामध्ये रेल्वे टर्मिनलची चालू असलेली बांधकामे यांची पाहणी केली. रस्ता रुंदीकरणातील बाधित क्षेत्राचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने भू संपादन करणे व रस्त्याच्या रुंदीत अडथळा ठरणारी बांधकामे नोटीसा देऊन व संयुक्तिक कारवाईचे नियोजन करून काढण्याचे आदेश पथ विभागास दिले आहेत.