
सुनील बागुल-मामा राजवाडेंच्या प्रवेशाची तारीख ठरली…
मारहाण आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांमुळे सुनील बागुल व मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश रखडला होता. मात्र तक्रारदाराने गुन्हा मागे घेतल्याने भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बागुल व राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहुर्त ठरला असून स्वत: सुनिल बागुल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यासंदर्भात माहिती दिली.
शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे येत्या रविवारी( दि. २७) नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. बागुल व राजवाडे यांच्यासह काही माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विलास शिंदे यांनी शिवसेना(शिंदे गट) प्रवेश केल्याने त्या जागी मामा राजवाडे यांची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महानगप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पाचच दिवसांत त्यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बागुल आणि राजवाडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश ठरला होता. परंतु बागुल व राजवाडे यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या वरिष्ठांनी या पक्षप्रवेशाला ब्रेक लावला.
परंतु आता सगळ्या गोष्टी निवळल्या असून येत्या रविवारी भाजप मधील प्रवेश निश्चित झाल्याचे बागुल यांनी सांगितले आहे. या प्रवेश सोहळ्यासाठी नाशिकचे तिन्ही आमदार, मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याने ते उपस्थित राहणार नाहीत. जिल्हाभरातील हजारो कामगार आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या प्रवेश सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बागुल यांनी दिली आहे. एका चांगल्या जोमाने आणि चांगल्या दमाने पुन्हा एकदा राजकारणामधे आम्ही एंट्री करतोय आणि चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात करतोय असं सुनील बागुल म्हणाले.
यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन करत सुनील बागूल आणि मामा राजवाडे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी देखील हा मोठा धक्का असणार आहे. भाजप व शिवसेना (शिंदे गटाने) एक एक करत ठाकरे गटातील असंख्य बडे मासे आजवर आपल्या गळाला लावले आहेत. भाजपने नाशिक मनपासाठी शंभर प्लसला नारा दिला असल्याने भाजपची इनकमिंग मोहीम जोरात आहे.