
नाशिकच्या चाकरमान्यांची समस्या खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केली. पुण्याच्या डेक्कन क्वीनचा दर्जा आणि सुविधा नाशिकच्या पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेसला का मिळत नाही?असा सवाल खासदार वाजे यांनी केला.
पंचवटी एक्सप्रेस सकाळी साडे नऊला मुंबईला पोहोचावी, अशी सूचना त्यांनी केली.
नाशिक आणि मुंबई दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या हा गंभीर प्रश्न बनला आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्रालयाला चांगलेच धारेवर धरले. नाशिकला आजवर सापत्न वागणूक मिळाली. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. रेल्वे गाड्यांतील असुविधा तातडीने दूर झाल्या पाहिजे.
पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस नाशिककरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गाडी आहे. या रेल्वे गाड्यांत अनारक्षित जागांचे डबे वाढवावेत. या गाडीची गती वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबत अनेकदा सूचना करूनही रेल्वे मंत्र्यालयाने त्याची गांभिर्याने दखल न घेतल्याने नागरिकांत नाराजी आहे.
पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेस मध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असते. या गाडीतील यंत्रणा अनेकदा ना दुरुस्त असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पंचवटी एक्सप्रेस ही नाशिक साठी प्रतिष्ठित गाडी होती. सध्या तिचा वेग आणि सेवा याबाबत दर्जा सातत्याने घसरतो आहे.
संदर्भात रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पंचवटी आणि राज्यराणी या सर्वच गाड्यांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या गाड्यांमधील स्वच्छतेबाबत यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे अशा सूचना सातत्याने दिल्या जातात.
ऑन बोर्ड प्रवाशांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी रेल्वेने संगणकीकरण आणि अन्य साधनांचा उपयोग केला आहे. ऑनलाइन तक्रार करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारी तातडीने दूर केल्या जातात. या सुविधा आणि साधनांची गती आणि सेवेचा विस्तार करण्यात येईल असे रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितले.