
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुनील बागुल यांचा रखडलेला भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. इतर रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हा प्रवेश होणार आहे.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ माझी नगरसेवक शाहू खैरे यांच्याही प्रवेशाची चर्चा आहे.
शिवसेनेचे बडतर्फ उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांसह त्यांचे समर्थक येथे रविवारी भाजप पक्षात प्रवेश करतील. यानिमित्ताने पोलिसांच्या माध्यमातून लावलेला भाजपचा राजकीय ट्रॅप यशस्वी झाला अशी चर्चा आहे. सुनील बागुल आणि श्री राजवाडे यांचा प्रवेश दोन आठवड्यापूर्वीच अपेक्षित होता. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात त्याची सर्व तयारी देखील झाली होती. मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे भाजपने तो कार्यक्रम स्थगित केला होता.
भारतीय जनता पक्षाच्या मिशन हंड्रेड प्लस अंतर्गत येत्या रविवारी नाशिक मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा प्रवेश होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे दोन प्रमुख नेते पक्षाच्या गळ्याला लागले आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य काही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेते सुनील बागुल आणि त्यांच्या समर्थकांवर हिंदुत्ववादी कार्यकर्ते गजू घोडके यांनी फेसबुक लाईव्ह करून गंभीर आरोप केले होते. या संदर्भात ईडीकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून निर्माण झालेल्या वादात बागुल समर्थकांनी खोडके यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण केल्याचा आरोप होता. त्यातूनच हे प्रकरण चिघळले.
याबाबत सुनील बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात दरोड्यासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमुळे श्री बागुल आणि त्यांचे समर्थक पोलिसांच्या रेकॉर्डनुसार फरार झाले होते. या गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठीच श्री बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती.
त्यानंतर झालेल्या राजकीय आणि नाट्यमय घडामोडीत तक्रार करणारे घोडके यांनी आपली तक्रार मागे घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये पोलिसांचा भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशासाठी राजकीय वापर झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते राऊत यांनी केला होता. त्याला दुजोरा मिळेल अशा घटना शहरात घडल्याने सुनील बागुल यांच्यासाठी भाजपने लावलेल्या ट्रॅप यशस्वी झाला अशी चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
येत्या रविवारी नाशिक शहरात हा प्रवेश होणार आहे. सुनील बागुल हे रिक्षा आणि टॅक्सी सह विविध संघटनांचे नेतृत्व करतात. त्यामुळे या कार्यक्रमात श्री बागुल शक्ती प्रदर्शन करतील. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्व दिले जात आहे.