
भाजपचे गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आक्रमक…
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. ख्रिस्ती समाजाविषयी अमानस्पद आणि धमकी दिल्याने पडळकर यांच्या विरोधात सरकारने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे वादग्रस्त विधान केले. एका तरुणीच्या आत्महत्ये संदर्भात त्यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंविषयी अपमानास्पद भाषेचा वापर केला. ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार करणाऱ्यास बक्षीस देण्याचेही त्यांनी जाहीर केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाने त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यासंदर्भात धुळे शहरातील ख्रिस्ती समाज बांधव एकवटले. यावेळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यामध्ये विविध पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे ख्रिस्ती धर्मगुरू सिताराम राऊत सुरेंद्र दळवी डॅनियल कुवर हुजी वारीस यांसह अनेक प्रतिष्ठित समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी कायद्याचा भंग करत गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचे जाहीर विधान केले आहे. त्यामुळे त्यांचे आमदारकी रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
श्री मलबारी म्हणाले, आमदार पडळकर हे नेहमीच वादग्रस्त आक्रस्ताळी विधाने करतात. सांगली येथील कार्यक्रमात त्यांनी खुलेआम ख्रिस्ती धर्मगुरूंची हत्या करण्याबाबत विधान केले. हत्या करणाऱ्यास रोख बक्षीस देण्याचेही त्यांनी जाहीर केले. हा गुन्हेगारीला प्रोत्साहन आणि कायद्याचा भंग आहे.
जाहीर समारंभात एखाद्या समाजाची बदनामी होईल अशी विधाने करणे चुकीचे आहे. त्याला पायबंध घातला पाहिजे. अशी विधाने करणाऱ्यांना कायद्याने देखील मनाई केली पाहिजे. आमदार पडळकर यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. विधिमंडळाचा सदस्य अशाप्रकारे कायद्याचा भंग करत असेल, तर सरकारनेच त्याच्यावर कारवाईसाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे आमदार पडळकर यांचे आमदारकी तातडीने रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.