
अजितदादांच्या ‘वॉर्निंग’नंतर फडणवीस अन् तटकरेंच्या बैठकीत प्लॅन ठरला !
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची ‘रमी’ गेमने चांगलीच गोची केली आहे. विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कोकाटे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे.
कारण, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता थेट कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. रमी व्हिडिओच्या वादावर माणिकराव कोकाटेंशी बोलून येत्या सोमवारी किंवा मंगळवारी निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.
अशातच आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात एक बैठक झाली झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
या बैठकीत माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, असल्याची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्यांही सूत्रांची सांगितलं आहे. त्यामुळे आता नेमकी खांदेपालट काय केली जाणार आणि कृषी खातं कोणाकडे दिलं जाणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
कोकाटेंच्या पाठीशी कोणीच नाही
माणिकराव कोकाटे यांचं कृत्य सरकारसाठी भूषणावह नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटेंबाबत निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ, प्रत्येकाने भान ठेवून वागलं आणि बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे.
इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका हे मी यापूर्वीच सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन.” दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे आता कोकाटेंचे मंत्रिपद जाणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.