
रोहित पवारांचं ट्विट चर्चेत…
विधिमंडळाच्या सभागृहात लक्षवेधी सुरू असताना ऑनलाईन रमी खेळणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत आहे.
कृषीमंत्र्यांचा राजीनामा…; रोहित पवारांनी काय लिहिलं?
आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत उपमुख्यमंत्री कधी दाखवणार? असा सवाल त्यांनी केला आहे.
कोकाटे सोमवारी अजित पवारांना भेटणार
कोकाटे यांचे खाते बदलले जाणार, की त्यांना राजीनामा द्यायला सांगणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमवारी कोकाटे हे आपल्याला भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे गुरुवारी अजित पवार यांनी स्पष्ट केले. कोकाटे हे सभागृहात लक्षवेधी सुरू असताना ऑनलाईन रमी खेळत बसल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर ते स्वतः अडचणीत आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही टीका सहन करावी लागत आहे. त्यातच कोकाटे यांनी ‘शेतकरी नाही, सरकार भिकारी’ असल्याचे वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सुनावले. या पार्श्वभूमीवर अजित पवार हे कोकाटे यांच्याशी चर्चा करणार आहेत. याबाबत अजित पवार म्हणाले, कोकाटे मला सोमवारी भेटणार आहेत. आम्ही समोरासमोर चर्चा करणार आहोत. त्यानंतर मी पुढील निर्णय घेईन. प्रत्येकाने भान ठेवून बोलले, वागले पाहिजे. यापूर्वीही कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले तेव्हा त्यांना समज दिली होती. इजा झाले, बिजा झाले, तिजाची वेळ येऊ देऊ नका. जर त्यांच्यावरील आरोपांत तथ्य आढळले, तर तो आमच्या अखत्यारीतील निर्णय असेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही मिळून याबद्दलचा निर्णय घेऊ. बाकी कोण काय बोलत आहे याला काहीही अर्थ नाही, असे अजित पवार म्हणाले.