
‘या’ दोन बड्या नेत्यांचा उद्या भाजप प्रवेश…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल तसेच ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या (29 जुलै) दुपारी 3 वाजता मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. या घडामोडीमुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कैलास गोरंट्याल हे जालना मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले प्रभावी नेते आहेत. गेल्या काही काळापासून ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा मतदारसंघात रंगली होती.
अखेर त्यांनी सुरेश वरपूडकर यांच्यासह भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोरंट्याल गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. या पक्षप्रवेशामुळे जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार
हा पक्षप्रवेश भाजपसाठी मराठवाड्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला कमजोर करण्याची भाजपची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होत असून, यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला होईल, अशी अपेक्षा आहे.