
पुढची 20 वर्षे तिथेच बसणार आहात…
लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर विशेष चर्चा झाली. या चर्चेची सुरुवात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. यावेळी विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकताना संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांपैकी फक्त पाकिस्तान आणि अन्य तीन देशांनीच याला विरोध केला होता, असे सांगितले.
यावेळी विरोधकांच्या हंगाम्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांना खडेबोल सुनावले.
जयशंकर यांनी सभागृहात सांगितले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला ठोस संदेश देणे आवश्यक होते. यावेळी त्यांनी ९ मे रोजी सकाळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्याशी झालेल्या फोन संभाषणाचा उल्लेख केला. व्हॅन्स यांनी पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत याला कणखर प्रत्युत्तर देईल. तसेच, २२ एप्रिल ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही थेट संवाद झाला नसल्याचेही जयशंकर यांनी स्पष्ट केले.
अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल-
जयशंकर यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ केल्याने गृहमंत्री अमित शाह संतप्त झाले. ते म्हणाले, “भारताचे विदेशमंत्री इथे बोलत आहेत, पण विरोधकांना त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना दुसऱ्या देशावर विश्वास आहे. म्हणूनच ते तिथे बसले आहेत आणि पुढील २० वर्षे तिथेच बसणार आहात. त्यांनी विरोधकांना खरमरीत टोला लगावला.
काँग्रेसवर जयशंकर यांचा पलटवार-
जयशंकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले, “ज्यांनी काहीच केले नाही, ते आज बहावलपूर आणि मुरिदके येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यावेळी एका खासदाराने मध्येच टिप्पणी केल्याने शाह पुन्हा संतप्त झाले. ते म्हणाले, इतक्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना सरकारच्या प्रमुख मंत्र्याला मध्येच टोकणे, माननीय, तुम्हाला शोभत नाही.
ऑपरेशन सिंदूर आणि कूटनीतीचे यश-
जयशंकर यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमुळे ‘टीआरएफ’ला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले. ही भारताच्या कूटनीतीची मोठी उपलब्धी आहे. तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी अमेरिकेशी झालेल्या चर्चेत व्यापाराचा कोणताही उल्लेख झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षातील काँग्रेस खासदार गौरव गोगोई आणि टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, सरकारने आपली भूमिका ठामपणे मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ही चर्चा लोकसभेत तणावपूर्ण वातावरणात पार पडली.