
‘पुणे रेव्ह पार्टी’बाबत मोठं विधान; फडणवीसांच्या खात्यावरच संशय…
खराडी येथे झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणावरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून हे प्रकरण म्हणजे रचलेलं कट – कारस्थान असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तर सत्ताधारी पक्षांकडून हे आरोप खोडून काढण्यात येत आहेत. अशातच सत्ताधारी पक्षातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणावर भाष्य करतानाच त्यांनी थेट गृहखात्यावरच संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणांमध्ये रूपाली पाटील ठोंबरे यांचे पती विजयसिंह ठोंबरे हे आरोपींकडून वकील म्हणून कोर्टामध्ये बाजू मांडत आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात प्राथमिक माहिती घेतल्यानंतर असं समोर आला आहे की, 1 ते 2 महिन्यापूर्वी त्यांची रेकी करण्यात आली होती. त्यामुळे ज्या काही घटना घडत आहेत. त्या विचार करायला लावणारे आहेत. पोलीस तपास सुरू असून त्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील.
या प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त यांना फोन करून पारदर्शक आणि योग्य कारवाई पुणे अपेक्षित असल्याच्या सूचना केल्या आहेत. कोणावर खोटे गुन्हे किंवा अन्यायकारक कारवाई होणार नाही. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अथवा इतर कोणी खोटा गुन्हा दाखल केला असल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या आदेश देतील.
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा अथवा खोटेपणा केला असेल पुण्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात. विरोधकांचं म्हणणं आहे या खोट्या प्रकरणात काही लोकांना गवण्यात येत आहे.
सत्ताधारी म्हणून आम्हाला कोणावरही खोट्या केसेस करण्याचा अधिकार नाही. हा समाजामध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी आपलं काम चोख रित्या करावं. खरंच अमली पदार्थ घेतात. त्यांच्यावर आळा बसला पाहिजे. मात्र, जर खोट्या कारवाई होत असतील तर पोलिसांची प्रतिमा मलीन होते.
सध्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात एकमेकांवर आरोपत्यारोप होत असतानाच अशाप्रकारे गुन्हा कसा दाखल होऊ शकतो असं संशय सर्वांनाच वाटत आहे.पोलीस तपास योग्य दिशेने झाला तर सर्व काही आपल्यासमोर येईल, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या म्हणाल्या
माजी मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीचं नाव पुणे शहरातील रेव्ह पार्टी प्रकरणात सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. रेव्ह पार्टी प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप, प्रतिक्रियांनी राजकारण तापलं असतानाच पत्नी रोहिणी खडसे मात्र शांत होत्या. मात्र, तब्बल 24 तासांनंतर रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी सावध आणि संयमी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत एक फोटो एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्यवेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र!” असं ट्विट खडसे यांनी केलं आहे.