
कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेवाले बायकोलाच घेऊन गेले; हातपाय जोडून नवऱ्याची गयावया…
पैशांचे लोन घेताना तारण म्हणून बँकेकडे काही वस्तू तारण ठेवावी लागते. तै पेस चुकवू शकले नाहीत तर बँक तारण म्हणून ठेवलेली ती गोष्टच जप्त करते, मग ते घर असू शकतं किंवा सोनं अथवा कार, बाीक वगैरे वगैरे.
पण बँकवाल्यांनी एखाद्या जिवंत व्यक्तीवर, तेही एखाद्या महिलेवरच जप्ती आणून तिला सोबत नेल्याचा प्रकार तुम्ही कधी ऐकला आहे का ? नाही ना, पण असं आता प्रत्यक्षात झालं आहे, तेही आपल्या भारत देशातच. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये बँकवाल्यांची गुंडगिरी दिसून आली. तेथे खाजगी बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे, एका खाजगी मायक्रो फायनान्स बँकेने एका महिलेला 5 तास ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. हप्ता दे आणि बायकोला ने, असं तिच्या पतीला सांगण्यात आलं अशी माहितीही समोर आली आहे.
हे प्रकरण बमहरौली गावातील आझाद नगर परिसरातील एका खाजगी गट कर्ज देणाऱ्या बँकेशी संबंधित आहे. येथे, पूंछ येथील बाबाई रोड येथील रहिवासी रवींद्र वर्मा यांच्या पत्नी पूजा वर्मा यांना सोमवारी दुपारी 12 वाजल्यापासून जबरदस्तीने बँकेत बसवण्यात आलं,असा आरोप आहे. पैसे द्या, तरच तुम्हाला तुमची पत्नी मिळेल – असं स्पष्ट उत्तर त्या महिलेच्या पतीला, रविंद्रला बँकेत पोहोचल्यावर देण्यात आलं. ते ऐकून तो हबकलाच, रवींद्रने तिथे खूप विनवणी केली, पण बँक कर्मचाऱ्यांनी जराही दया दाखवली नाही. शेवटी, हताश होऊन रवींद्रने 111 नंबरवर फोन केला. पोलिस येताच बँक कर्मचाऱ्यांचे चेहरे पडले आणि महिलेला घाईघाईने बाहेर काढण्यात आले.
हैराण करणारे आरोप
पीडित पूजा वर्मा हिने दिलेल्या अर्जात असं सांगितलं की, तिने 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. तिने आतापर्यंत 11 हप्ते भरले आहेत. परंतु बँकेच्या नोंदींमध्ये फक्त 8 हप्तेच दिसत आहेत. बँक एजंट कौशल आणि धर्मेंद्र यांनी तिचे तीन हप्ते हडप केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील टिकमगढ येथील रहिवासी असलेले बँक सीओ संजय यादव सोमवारी तिच्या घरी पोहोचले आणि धमकी देऊन पैशाची मागणी करू लागले,असा आरोप महिलेने केला. मात्र त्या महिलेने नकार दिल्यावर पती-पत्नीला जबरदस्तीने बँकेत आणण्यात आले आणि तिथेच अनेक तास बसवून ठेवण्यात आले, असंही महिलेचं म्हणणं आहे.
बँकेकडून स्पष्टीकरण
कानपूर देहात येथील रहिवासी बँक व्यवस्थापक अनुज कुमार यांनी सांगितले की, ती महिला गेल्या 7 महिन्यांपासून हप्ता भरत नव्हती, म्हणून तिला बोलावण्यात आले. एवढंच नव्हे तर ती महिला स्वतःच्या मर्जीने बँकेत बसली होती, असा दावाही त्यांनी केला. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बँक कर्मचारी, एजंट आणि पीडित व्यक्तीची चौकशी सुरू आहे. कर्ज वसुलीच्या नावाखाली लोकांना ओलीस ठेवण्यासारखे डावपेच आता सामान्य झाले आहेत का? या घटनेने केवळ बँकेच्या कामकाजावरच नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेवरही मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.