
रोहित पवारांनी सांगितला भयंकर प्रकार !
महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती. जमिनीचा वाद वाढत गेला, पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली.
वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारले. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढण्यात आला होता, हे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. मुंडे कुटुंबीयांकडून संपूर्ण प्रकरणाची माहितीही घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत. त्यांनी महादेव मुंडेंच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा टेबलवर वाल्मिक कराड याच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगितले. ही सर्व माहिती मला आज मुंडे कुटुंबाकडून सांगण्यात आली. मी या प्रकरणात एसपींना फोन केला. मात्र, एफआयआरमध्ये आणखी काही नावं आलेली नाहीत, असा आरोप रोहित पवारांनी केला.
सुप्रिया सुळे या प्रकरणाबाबत माहिती घेत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी देखील अधिवेशनात याचा पाठपुरावा केलाय सर्व जाती-धर्माचे लोक या परिवारातसोबत आहेत. एसपींशी बोलल्यावर आमचे समाधान झाले नाही. पुरावे असतानाही अद्यापही आरोपी अटक नाही. या प्रकरणात सीडीआर काढण्यासाठी कुटुंबाला खर्च करावा लागला. हा खर्च सरकारने न करता सतीश फड यांनी बहिणीला न्याय मिळावा यासाठी दीड लाख रुपये खर्च करून हा डाटा काढला होता. बांगर यांनी या प्रकरणाचे फोटो दाखवले होते, त्यामध्ये महादेव मुंडे यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारल्याचे दिसत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
महादेव मुंडे हत्याप्रकरणासाठी नेमलेल्या एसआयटीत संतोष साबळेंना घ्या: रोहित पवार
संतोष साबळे नावाचे पीआय आहे त्यांना या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीमध्ये घेण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचे अधिकार आयजीकडे असल्याने आयजींना देखील मी बोललो. ते सुट्टीवर असल्याने सध्या ड्युटीवर असलेल्या उमाप यांच्यासोबत माझी चर्चा झाली. रश्मी शुक्ला यांच्याकडे आता मी संतोष साबळे यांची नियुक्ती करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना भेटायचे आहे. मात्र त्यांना भेटू दिले जात नाही. मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की, यांच्याकडून तुम्हाला फोन केला जाईल किंवा तुम्ही परिवाराला फोन करून कुटुंबाचे म्हणणे ऐकावे व त्यांना न्याय द्यावा.
या प्रकरणात सर्व जाती-धर्माचे लोक आंदोलनाला बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावरच कारवाई केली. इथले लोक चांगले आणि प्रामाणिक आहेत काही ठराविक लोकांमुळे नाव खराब होत आहे. सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना पोलिसांचं संरक्षण दिले गेले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. कराड यांच्या परिचयाचे लोक चुकीच्या कामात आहेत. गांजा ड्रग्स विकणारे त्यांची माणस आहेत ते ठराविक लोक आहेत. ते लोक या परिवाराला काहीही करू शकतात. वाल्मीक कराड आणि जे कोणी या प्रकरणात जबाबदार असेल, त्यांचे नाव घेण्यात घेण्यात यावे, अशी आमची आणि मुंडे परिवाराची मागणी आहे.
दोन वर्षापासून मुंडे परिवार न्याय मागत आहे कितीतरी वेळा ते पोलीस ठाण्यात गेले आहेत. त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला. मुंडे प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे तिथे कुणाला तरी प्रशासन वाचवत आहे.महादेव मुंडे प्रकरणात बबन गित्ते यांच्यासह काही जणांचे नाव घेण्याचा दबाव होता, असे ज्ञानेश्वरी मुंडे सोबत चर्चा केल्यावर दिसून येते. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते प्रामाणिक लोक आहेत, हे ताकदीने लढत आहेत. बापू आंधळे प्रकरणात बबन गित्तेला अडकवले गेले, त्यामध्ये देखील वाल्मीक कराड होता. या ठिकाणी खून एकाने करायचा आणि दुसऱ्यालाच अडकवायचे, असे प्रकार होतात, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
वाल्मिक कराडची १००० कोटींची प्रॉपर्टी जप्त करा; रोहित पवारांची मागणी
वाल्मिक कराड याची १००० कोटीच्या प्रॉपर्टी जप्त करा. एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची एसआयटी नेमून चौकशी करा व पार्टनरशिप कोणाची आहे हे, लोकांना कळू द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या परिवारातील जे कोणी जबाबदार असतील त्यांचे नाव गुन्ह्यात घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड याच्या परिचयाची परळी भागात लोक आहेत गांजा आणि ड्रग्स विकनारी आहेत. ती लोक काहीही करू शकतात. वाल्मिक कराड आणि त्याच्या परिवारातील जबाबदार असेल त्यांना या गुन्ह्यांमध्ये नाव घेऊन त्यांच्या कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.