
लोकप्रतिनिधींकडून सह्यांची मोहीम; संसदेत आवाज उठवणार !
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील माधुरी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश सुरू आहे.
टोकाच्या विरोधानंतर वनताराकडे माधुरी हत्तीणीला पाठवण्यात आले. मात्र, तेव्हापासून सुरू असलेल्या एल्गार आजही कायम आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे. या संदर्भात आता सह्यांची मोहीम देखील राबवली जात आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरु केली आहे. खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचे म्हटलं आहे.
महादेवी हत्तीचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी
दुसरीकडे, आमदार विनय कोरे यांनी सुद्धा महादेवी हत्तीचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटलं आहे. अशाच पद्धतीने जोतिबाच्या सुंदर हत्तीची रवानगी करण्यात आली. मात्र तीन वर्षांमध्ये त्या हत्तीचा मृत्यू झाला आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा मृत्यू झाला. मात्र हे समोर येऊ दिले गेलं नाही, इतकी परिस्थिती विदारक असल्याचे आमदार कोरे यांनी म्हटलं आहे. हत्तीला परत आणण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात जनचळवळ कोल्हापूरमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे नांदणीकरांसह शिरोळ तालुक्यात सुद्धा अंबानी यांची उत्पादन न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जिओ पोर्ट करण्यात येत आहे. काल हजारो नागरिकांनी जिओ पोर्ट केल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर कस्टमर केअरच्या अधिकाऱ्यांना सुद्धा खडसावून तुमच्या अंबानीला निरोप द्या अशा पद्धतीने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीचा विषय आता चांगलाच तापला आहे.
भटक्या कुत्र्यांनी हैदोस, वनताराकडे सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पाहा
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, संसदेमध्ये महादेवी हत्तींसाठी वाच्चता फोडणार आहे. पेटा स्वतः प्राणी मित्र म्हणून घेत असेल, तर आमच्याकडे गावागावात भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहेत. शहरापासून गावापर्यंत भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला असून ती वनताराकडे सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पाहा, आम्ही त्यांना मदत करू अशा खोचक शब्दांमध्ये माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम केलं असून लोकसभेमध्ये हा विषय मांडणार असल्याचे ते म्हणाले. नांदणीमध्ये लोकांच्या भावनेच्या आक्रोश होता आणि त्यामधूनच तोडफोड झाल्याचे माने यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी कठर कारवाई करू नये, यासाठी मी मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे माने म्हणाले.