
मोठा निर्णय घेणार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करत त्यांना क्रिडा खात्याची जबाबदारी सोपवली, तर क्रिडा खात्याचे मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे कृषिखाते दिले.
माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्य आणि विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे फेरबदल करण्यात आले.
मंत्रिमंडळातील या फेरबदलामुळे एकनाथ शिंदे यांची देखील धाकधूक वाढली आहे. या बदलामुळे शिवसेनेचे मंत्री जे अडचणीत आहेत. त्याच्यांवर आरोप केल्या जात आहे त्याच्या देखील खात्यामध्ये बदल करण्यात यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावे यासाठी शिंदेंवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबारचे परमीट असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खोलीत पैशाची बॅग असल्याचा व्हिडिओ समोल आल्यानंतर त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी होत आहे. या दोन्ही मंत्र्यांना शिंदे यांनी अभय दिले होते. मात्र अजित पवारांच्या मंत्र्याच्या खात्यामध्ये झालेले बदल पाहता शिंदेवर देखील कारवाईसाठी दबाव असणार असल्याची चर्चा आहे.
निर्णय अजितदादा- मुख्यमंत्री फडणवीसांचा
मंत्रिमंडळात झालेल्या खातेबदला विषयी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घेतला आहे. यामध्ये नक्कीच सरकार हे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मागील वर्षीपासून सरकारने केले आहे. 45 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना ते नुकसान भरपाई म्हणून इतर सोयीसुविधा असतील सन्मान योजना असतील या स्वरुपात दिले असल्याचे देखील शिंदे म्हणाले.
दिल्लीत गाठीभेटी
एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेशनाच्यावेळी अचनाक दिल्लीला गेले. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे देखील दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. आता पुन्हा एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे नेमके कारण समोर आले नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना जागा वाटपात मोठा वाटा मिळावा यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर गेल्याची चर्चा आहे.