
रोहित पवारांचा सरकारला इशारा !
विधानपरिषद सभागृहाचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर रमी खेळताना व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समोर आणला होता. या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले असून त्यांना कृषिखाते मात्र गमवावे लागले आहे.
विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. सतत होणाऱ्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याचा कार्यभार काढून तो त्यांचे अत्यंत विश्वासू असनारे सहकारी दत्ता भरणे यांच्याकडे सोपवला आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचा कार्यभार कोकाटेंना दिला आहे. सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर येथे गुरुवारी (31 जुलै) उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक झाली.
माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते काढण्याचा निर्णय झाल्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खाते बदलाबाबतचे पत्र दिले. या पत्रानुसार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये एकमेकांचे खाते बदलण्याचा निर्णय झाला. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही अल म्हटले आहे.
कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती.
सरकारने कोकाटे साहेबांच्या राजीनाम्याऐवजी कृषी खाते काढून क्रीडा खाते देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा खाते देखील युवांच्या दृष्टीने महत्वाचे असून या खात्यात काम करताना भूतकाळातील चुका टाळून आपल्या अनुभवाचा योग्य तो वापर करून क्रीडा क्षेत्रास न्याय देतील तसेच नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करतील, ही अपेक्षा.
कोणत्याही खात्यात गलथान कारभार होऊन सर्वसामान्यांना फटका बसत असेल तर संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार असते, त्यामुळे खातेबदल केला म्हणजे आपण सुटलो असा गैरसमज नेतृत्वाने करून घेऊ नये. आमचे सर्वच खात्यावर लक्ष राहते आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्यांचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, त्यामुळे सर्वच मंत्री जबाबदारीने वागतील, ही अपेक्षा!
दरम्यान, माणिकराव कोकाटेंना क्रीडा खाते मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये म्हटले आहे की महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो, अथवा न मिळो. मात्र, महायुतीमधील मंत्र्यांच्या कला-गुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘रमी’राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांना टोला लगावला आहे.