
कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती…
विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला असून त्यांच्यावर क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यभरातून कोकाटेंचा राजीनामा न घेता खात बदल केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी विनंती केली आहे.
सुळे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या भूमिकेवर खंत व्यक्त करत मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यावा असा सल्ला दिला आहे.
सुळे नेमकं ट्विटमध्ये काय म्हणाल्या ?
राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे. महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे.
विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे.