
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकारावरून राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची लूट झाली आहे. अशा लाभार्थ्यांकडून वसुलीचे फर्मान अन् योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचे फर्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, घोटाळे करणारे कोण? असा सवाल केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. तसेच ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची चौकशी करून पैसे वसूल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले.
माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. या छाननीत तब्बल २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेतल्याचे समोर आले असून, त्यांचा लाभ थांबविण्यात आला आहे. यात काही पुरुषांनीही लाभ घेतल्याची गंभीर बाब समोर आली. या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करा, त्यांच्या घरी विकलांग किंवा अन्य कारणांनी महिलांचे खाते नसेल आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले का हेही तपासा. ज्या प्रकरणांत पुरुष दोषी असतील तर त्यांच्याकडून वसुली करा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आदिती तटकरेंचा इशारा
या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत असताना या योजनेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. तसेच चुकीचे प्रकार थांबवण्यासाठी विभाग किंवा शासन योग्य ते पाऊल उचलत आहे. चुकीच्या लाभार्थ्यांनी शासनाची दिशाभूल केलेली असल्यास ती रक्कम वसूल करण्याबाबत शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.