
राज्यसभेचे माजी सभापती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी भाजपने राज्यसभेत एक महत्त्वाची राजकीय आघाडी मिळवली आहे.
एप्रिल 2022 नंतर भाजपने पहिल्यांदाच राज्यसभेत 100 चा आकडा पार केला आहे. या सदस्यांमध्ये राष्ट्रपतीद्वारे मनोनीत चार सदस्यांचा सुद्धा समावेश आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी आपपाल्या क्षेत्रात निपुण असलेल्या चार लोकांना राज्यसभा सदस्य म्हणून मनोनीत केलं होतं. यात प्रख्यात वकील उज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला सामाजिक कार्यकर्ते सदानंदन मास्टर आणि राजकीय इतिहासकार मीनाक्षी जैन यांचा समावेश आहे.
मागच्या महिन्यात शपथ घेणाऱ्या चार सदस्यांपैकी तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेणारे प्रख्यात वकील उज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृगंला आणि सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे. या मनोनीत सदस्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपने पुन्हा एकदा राज्यसभेत 102 चा आकडा पार केला आहे.
दुसऱ्यांदा असं घडलं
भाजपच्या राज्यसभा खासदारांची संख्या 100 पार होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 31 मार्च 2022 रोजी 13 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निकालानंतर भाजप खासदारांची संख्या 97 वरुन वाढून 101 झालेली. काँग्रेसला 1988 आणि 1990 साली हा गौरव प्राप्त झालेला.
NDA चे राज्यसभेत किती खासदार?
राज्यसभेत विद्यमान खासदार संख्या 240 आहे. यात 12 नामनिर्देशित सदस्य आहेत. पाच जागा अजूनही रिकाम्या आहेत. सध्या NDA खासदारांची संख्या 134 आहे. यात 12 मनोनीत सदस्यांपैकी पाच भाजपत सहभागी झालेत. अशा प्रकारे भाजपचे एकट्याचे 102 खासदार आहेत. सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 121 संख्याबळापेक्षा हा आकडा जास्त आहे.
राष्ट्रपतींनी निवडलेले चार खासदार कोण?
प्रख्यात वकील उज्जवल निकम एक विशेष सरकारी वकील आहेत. त्यांनी 26/11 मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली. सोबतच देशासाठी अनेक महत्त्वाचे खटले लढवले. 2016 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
हर्षवर्धन श्रृंगला 2020 ते 2022 पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते. जी 20 शिखर सम्मेलनात मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम केलेलं. त्यांनी अमेरिकेत भारतीय राजदूत आणि बांग्लादेशात उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे.
सी सदानंदन मास्टर केरळमधील एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. शिक्षक आहेत. 1994 साली त्यांचा पाय कापून टाकलेला. सीपीएम कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा त्यांचा दावा होता. ते भाजपमध्ये सहभागी झाल्याने नाराजीतून हा हल्ला झालेला.
त्याशिवाय राजनीतिशास्त्री आणि इतिहासकार मीनाक्षी जैन यांना सुद्धा राज्यसभेसाठी मनोनीत करण्यात आलय. त्या भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद सदस्य होत्या आणि 2020 मध्ये त्यांना पद्मश्रीने सम्मानित केलेलं.