
चंद्रकांत पाटलांना ‘वगळताच’ अजितदादांचा टोला; फडणवीस म्हणाले तुम्हीच त्यांना…
पुणे : ‘दादा’ या विषयावरून झालेल्या कोट्या आणि लगावलेले टोले… नितीन गडकरींनी चांगले रस्ते केल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुरत व पुढे गुवाहाटीपर्यंत मारलेली मजल…
आणि पुण्याचेच पालकमंत्री असताना पुण्यातच पुणेकरांना काढलेल्या चिमट्यानंतर अजित पवारांनी केलेली सारवासारव… अशा किश्श्यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या घरात ‘दादा’म्हटलं जायचं…या ‘दादा’नं देश गाजवला. आज आपल्या व्यासपीठावरही दोन दादा आहेत, एक अजितदादा (पवार) आणि दुसरे रोहितदादा (टिळक) असा उल्लेख निवेदिकेने केला. मात्र, प्रत्यक्षात व्यासपीठावर असलेल्या चंद्रकांतदादांचा त्यांना विसर पडला.
‘हाच धागा पकडत अजित पवार यांनी निवेदिका पुण्याच्याच आहेत का हो?’ असा मिश्कील सवाल करताच सभागृहात हशा पिकला. ‘म्हणजे मुख्यमंत्री महोदय, चंद्रकांतदादांना आमचे पुणेकर अजून कोल्हापूरचेच समजतात. ही काय अडचण आहे? तुम्ही सगळीकडे लक्ष घालता; इथेच लक्ष घालत नाही,’ असा टोला अजितदादांनी लगावला. त्यावर ‘तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही,’ अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली. त्यावर ‘तुमच्याबरोबर यायचं ठरलं, तेव्हा पुण्याचा पालकमंत्री करतो, हे कबूल केलंत म्हणून तुमच्यासोबत आलो,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आणि पुन्हा हास्यस्फोट झाला.
नितीन गडकरींनी देशात सर्वदूर चांगले रस्ते केले आहेत. सुरत, गुवाहाटीचे रस्तेही त्यांनीच केले होते,’ अशी टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली. ‘त्यामुळेच तुमची सोय झाली. लवकर पोहोचलात. तुमच्यामागे आम्ही पोलिस पाठवले; पण त्यांनाही तुम्हाला गाठता आले नाही,’ असा टोला अजित पवारांनी लगावताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.
मराठी लोकप्रतिनिधी दिल्लीत नितीन गडकरींकडे हक्काने जाऊन काम करून घेतात. गडकरी त्यांना खाऊ-पिऊ घालतात. ते नाश्ता करून, जेवण करूनच आला असशील, असा पुणेरीपणा ते दाखवत नाहीत… अशी टिप्पणी अजित पवारांनी केली खरी; पण आपण पुण्याचेच पालकमंत्री असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ‘गमतीचे जाऊ द्या. मला पुण्यात राहायचे आहे. पुणेकरांसारखी हुशार माणसे देशात काय, जगातही मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या,’ अशी त्यांनी केलेली सारवासारवही दाद घेऊन गेली.